वास्तवBreaking NewsMPSC

स्पर्धा परिक्षांचे प्रांगण! गरज? जनक? By भूषण देशमुख सर

स्पर्धा परिक्षांचे प्रांगण!

स्पर्धा परिक्षा दोन प्रकारच्या असतात.
1. सैनिकसेवासाठी   आणि
2. नागरीसेवासाठी. 

आपण नागरीसेवांबद्दल माहिती पाहूया.
मुळात या परिक्षांचा हेतू प्रशासकीय कार्यासाठी चांगल्या लोकांची निवड करणे हा आहे. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नव्हे, ती जनतेच विखुरली असते.

स्पर्धा परिक्षा ही सामान्यांना अशी स्पर्धा असते की ज्यातून तुम्हाला आपले हिरा असणे सिद्ध करता येते. अगदी प्राचीन मौर्य साम्राज्यात अशा प्रकारे परिक्षा घेऊन अधिकारी निवडत.
चीनमध्ये तर शतकानुशतके अशी परिक्षा देऊन सामान्यांनी असामान्य कामगिरी केली. चीनमधील अशा प्रशासकांना ‘मॅडरीन’ असे म्हणतात. आपल्याकडे आपण ‘नोकरशाही’ (Bureaucracy) असे म्हणतात.
या परिक्षांमुळे गुणवत्तेला वाव मिळतो व सरकारलाही चांगले कर्मचारी मिळतात. चांगल्या प्रशासकांचे महत्व सरकारच्या बाबतीत अधिक आहे कारण सरकारी कामकाज गुंतागुंतीचे असते.

भारतासारख्या देशात जिथे गरिबी ठाण मांडून बसली आहे, तिथे प्रशासनाचे योग्य निर्णय वरदान ठरतात तर चुकीचे शाप. खाजगी क्षेत्रातील व्यवस्थापकांनी चुकीचे निर्णय घेतले तर कंपनीचे फक्त आर्थिक नुकसान होते, सरकारी नोकरशाहीच्या चुकांच्या फटका संपुर्ण देशाला बसतो.अशा प्रकारे भारताचे भवितव्य घडवण्याची ऐतिहासिक संधी या परिक्षेतून मिळते.

रंग दे बसंती सिनेमामध्ये मोठा उद्बोधक प्रसंग आहे. तरूणांचा गट भ्रष्ट मंत्र्याला मारून रेडीयोवर लोकांसमोर आपले म्हणणे मांडतो. एक श्रोता तिरकसपणे प्रश्‍न विचारतो ‘आपकी लिस्ट पर कौन कौन है?’ तेव्हा तो तरूण उत्तर देतो की, ‘हमारी ऐसी कोई लिस्ट नही है!’ मग आता पुढे काय काय करणार यावर तो उत्तर देतो की आता आम्ही प्रशासनात जाऊ . आय. ए. एस., आय. पी. एस. बनू व देशाच्या उत्थाणासाठी प्रयत्न करू. ब्रिटिश काळात देशांसाठी प्राण देणार्‍यांची गरज होती, आज जगणार्‍यांची गरज आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशाला रोजच्या रोज चालवायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर नोकरशाहीची गरज भासते. भारतासारख्या अविकसीत देशात नोकरशाहीने स्थिती ‘जैसे थे’ न ठेवता विकास घडवून आणणे आवश्यक असते. थोडक्यात भारतातील प्रशासनाने विकासाचे साधन म्हणून काम करणे अपेक्षित असते.

राजकीय व्यवस्था अस्थिर असते. सरकारे उभी राहतात, पडतात. पण म्हणून शासन व्यवस्था होऊन चालणार नाही. प्रशासनाची ‘स्टीलफे्रम’ ही संरचना कार्यरत ठेवते. ड्रायवर कोणीही असो ही गाडी आपले काम निष्ठेने करते.
ब्रिटिश काळात नोकरशाही ब्रिटिशांची एजंट होती. ती विकासाच्या योजनांना, लोकसहभागाला हाणून पाडे. अशा नकारात्मक भूमिकेमुळेच सुभाषचंद्र बोसांनी आय. सी. एस्. चा राजीनामा दिला तर अरविंद घोष रूजूच झाले नाहीत. अशी ही बदनाम सेवा बंद करायची काहीची मागणी होती. पण सरदार पटेल मध्ये पडले. ते म्हणाले या सेवा नसतील तर हा अवाढव्य देश चालवणार कोण? आपण त्यांचा दृष्टीकोन व कार्यशैली सुधारून घेऊन पण त्यांना बरोबर घेऊनच जाऊ. पटेलांचा हा आग्रह मान्य झाला व जुन्या आय. सी. एस. ICS चे रूपांतर आय. ए. एस. IAS मध्ये झाले. आय.सी.एस चे जनक लॉर्ड कॉर्नवालीस जरी मानले जातात, तरी या नव्या रूपाचे आय.ए.एस चे जनकत्व सरदार पटेलांकडे जाते.

पटेलांनी नोकरशाहींची स्वातंत्र्यानंतर बैठक घेतली. आपल्या भवितव्याच्या चिंतेने अनेकांचे चेहरे काळवंडले होते, काही जण ब्रिटिशांसारख्या शिस्तप्रिय साहेब निघून चालल्याने निराश झाले होते. कोणातच उत्साह नव्हता. पटेल त्यांच्यासमोर मोजकेच बोलले. पण ते जे बोलले त्यातून नूर पालटला व सगळ्यांना उत्साह आला.

पटेल म्हणाले, ‘ज्या गोष्टीने मला आजवर अपरंपार आनंद दिला ती गोष्ट मी आज तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. ती म्हणजे देशसेवा’ ही भेट दोन्ही हातांनी भरभरून घ्या. ती कशी घ्यायची हे आपण लवकर बघू. ही एक विशिष्ट संधी आहे. ती चुकवता कामा नये.

भूषण देशमुख ✍

2,113 Comments