MPSCBreaking News

RTO पदाप्रमाणेच PSI पदासाठी सुद्धा स्वतंत्र मुख्य परीक्षा घ्यावी.. विद्यार्थ्यांचे सन्माननीय MPSC आयोगाला कळकळीचे आवाहन..

**महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील फौजदार पदाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विद्यार्थ्यांचे सन्माननीय MPSC आयोगाला कळकळीचे आवाहन…**

**RTO पदाप्रमाणेच PSI पदासाठी सुद्धा स्वतंत्र मुख्य परीक्षा घ्यावी.**

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 2017 पूर्वी अराजपत्रित गट ‘ब’ पदांसाठी वेगवेगळ्या पूर्व परीक्षा तसेच त्यांच्या कर्तव्याशी निगडित असणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळ्या मुख्य परीक्षा घेतल्या जात होत्या.
2017 पासून ‘संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) या नावाने PSI, STI, ASO या पदांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा सुरू झाली.

या निर्णयामुळे कालांतराने एक बाब प्रकर्षाने जाणवू लागली की, ग्रामीण भागातील PSI ची तयारी करणारे विद्यार्थी पूर्व परीक्षेतूनच बाहेर पडू लागले. कारण प्रामुख्याने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी PSI पद स्वीकारण्याची इच्छा नसताना सुद्धा STI, ASO पदाच्या आकर्षणापोटी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये विशेषकरून PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले.

पुढे माहितीच्या अधिकारातून MPSC आयोगाकडून मागवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे अशी बाब समोर आली की, प्रत्येक वर्षी PSI पदाच्या शारीरिक चाचणीसाठी व मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थ्यापैकी तब्बल 45% विद्यार्थी गैरहजर राहू लागले. याचा अर्थ, मूळ राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी प्रत्यक्षात PSI पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास होऊन सुद्धा शेवटच्या मुलाखत व शारीरिक चाचणीच्या टप्प्यावर गैरहजर राहू लागले. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील, दुर्गम भागातील पोलीस प्रशासनामध्ये PSI म्हणून काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ लागला.

अलीकडच्या काळात या आव्हानावर सुद्धा मात करत PSI ची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी PSI पदाच्या अंतिम यादीमध्ये आपले नाव झळकवले.

राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत राज्यसेवेच्या अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या सर्व परीक्षा देतात (अर्थात राज्यघटनेप्रमाणे त्यांना तो हक्क आहे).
मागील STI, ASO परीक्षांच्या अंतिम यादीकडे कटाक्ष टाकल्यास आपणास एक बाब प्रकर्षाने जाणवेल की, STI, ASO ही दोन्हीही पदे संयुक्त गट ब परीक्षेतील असून देखील ही पदे संयुक्त गट ब परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच हाती लागलेली नाहीत. ही पदे नेहमीच राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनांच मिळालेली आहेत. कारण STI, ASO मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील काही भाग जसाच्या तसा असल्यामुळे STI, ASO साठी कोणतीही वेगळी तयारी न करता राज्यसेवेचा विद्यार्थी ही पदे मिळू लागला.
मात्र PSI मुख्य परीक्षेमध्ये PSI पदाच्या कर्तव्याशी निगडित असणारा कायद्यांचा अभ्यास काही अंशी राज्यसेवा मुख्य परीक्षेपेक्षा वेगळा असल्यामुळे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी PSI पूर्व परीक्षा पास होऊन सुद्धा विशेषकरून मुख्य परीक्षेची गांभीर्याने तयारी करत नव्हते. त्यामुळे विशेषकरून PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडाफार दिलासा मिळत होता.

अलीकडीच्या काळात PSI परीक्षेसाठीची शारीरिक चाचणी Qualifying करण्यात आली. त्यामुळे PSI पदावर काम करण्याची इच्छा नसताना सुद्धा राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे पद मिळेपर्यंत PSI या पदाकडे तात्पुरती सोय म्हणून पाहू लागले.
त्यामुळे विशेषकरून PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणखी नवीन संकट उभे राहिले.

यातच आणखी नवी भर म्हणजे, सन्माननीय आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ पदांच्या सर्वच मुख्य परीक्षांसाठी राज्यसेवेला समांतर असणारा एकच अभ्यासक्रम जाहीर केला.
आता या अभ्यासक्रमामुळे लख्ख प्रकाशाइतके सत्य आहे की, जो प्रकार आतापर्यंत STI, ASO च्या बाबतीत दिसत होता, तोच प्रकार यापुढे PSI च्या बाबतीत सुद्धा तंतोतंत दिसेल.
म्हणजेच राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे पद मिळेपर्यंत STI, ASO पदाबरोबरच आता PSI या पदाकडे सुद्धा तात्पुरती सोय म्हणून पाहू लागतील आणि PSI पदावर काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा विद्यार्थी कायमस्वरूपी स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल.
भविष्यातील हे विदारक चित्र, PSI ची तयारी करणाऱ्या बहुतांशी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत आहे.
मात्र PSI ची तयारी करणारा विद्यार्थी संपूर्णपणे हतबल झालेला आहे.
ही बाब कालांतराने सर्वांच्याच लक्षात येईल, पण त्यावेळी खूप उशीर झालेला असेल.

त्यामूळे PSI पदावर काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि जीवाच्या आकांताने PSI पदासाठी तयारी करणाऱ्या आम्हा सर्व विद्यार्थ्यांची सन्माननीय MPSC आयोगाकडे अशी कळकळीची मागणी आहे की, RTO पदाप्रमाणेच PSI पदासाठी सुद्धा स्वतंत्र मुख्य परीक्षा घेऊन आम्हाला न्याय द्यावा.

सन्माननीय आयोगाने (MPSC) याचा गांभीर्याने विचार करावा, ही नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button