ग्रामीण भागातील तरुणांचं फौजदार बनण्याचं स्वप्न भंगले…
ग्रामीण भागातील तरुणांचं फौजदार बनण्याचं स्वप्न भंगले...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राज्यसेवेतील गट क व गट ब पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाते. यामध्ये पूर्वी गट अ व गट ब राजपत्रित पदांसाठी राज्यसेवा परीक्षा. तर गट ब अराजपत्रित व गट क या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात होत्या.
कालांतराने म्हणजेच 2017 पासून गट ब व गट क साठी संयुक्त परीक्षा सुरू झाली. गट ब मध्ये PSI, STI, ASO व संयुक्त परीक्षा गट क ज्यामध्ये Tax assistant, Typist, clerk अशा परीक्षा घेण्यात आल्या.
या निर्णयामुळे PSI ची तयारी करणारा वर्ग मात्र नाराज झाला. कारण ग्रामीण भागातील तरुण हा वर्दीचे आकर्षण घेऊन PSI ची तयारी करण्यासाठी पुण्यासारख्या इतर जिल्ह्यांमध्ये येत असतो. त्यातच या निर्णयाने STI, ASO ची तयारी करणारे तसेच राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी हे पूर्व परीक्षेसाठी PSI चे प्रतिस्पर्धी बनले व त्यामुळे राज्यसेवा, STI, ASO ची तयारी करणारे विद्यार्थी मेरीट वाढवू लागले. एकच विद्यार्थी तीनही पोस्ट वर निवड होऊ लागला. तरीही हा अन्याय मात्र ग्रामीण भागातील फौजदार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विद्यार्थ्यांनी सहन केला आणि परीक्षेला सामोरे गेले.
फौजदार आणि ग्रामीण भाग हे समीकरण वेगळेच होत कारण PSI म्हटलं की शारीरिक चाचणी सोबत वर्दीची आवड, जिद्द आणि पोलीस खात्यामध्ये काम करण्याची आवड… PSI बनण्याचे स्वप्न पाहणारा 90% पेक्षा जास्त वर्ग हा ग्रामीण भागातील आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि हेही वास्तव नाकारू शकत नाही की STI, ASO ची तयारी करणारा विद्यार्थी हा PSI ची तयारी करण्याची शक्यता खूप कमी असते. कारण तो राज्यसेवेची तयारी करणार असतो.
यामध्ये आयोगाने पुन्हा दोन झटके दिले. त्यामध्ये पहिला म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक केली आणि राज्यसेवेचा अभ्यास करणारा विद्यार्थी संयुक्त परीक्षेकडे वळला. त्यातच आयोगाने PSI साठीची मैदानी चाचणी देखील Qualify केली आणि त्यामुळे ज्याची आवड नाही, ज्याची तयारी नाही, ज्याचे ध्येय नाही तो देखील परीक्षेतील गुणांच्या जीवावर PSI होण्याकडे मार्गक्रमण करणार हे वास्तव आहे.
अर्थात आपण कोणालाही थांबवण्यासाठी किंवा PSI ची परीक्षा देऊ नका हे सांगण्यासाठी हे बोलत नाहीत परंतु हे वास्तव आहे त्यामुळे दोन्हीही वर्गाचे नुकसानच आहे. त्यामध्ये राज्यसेवेतून उपजिल्हाधिकारी, DySp, तहसीलदार किंवा इतर स्वप्न पाहणाऱ्याला PSI या पदावर समाधान मानावे लागणार हा दुहेरी तोटा.
मात्र याविरोधात कोणीही विद्यार्थी बोलू शकत नव्हते कारण आयोगाने कारवाईचा धडाका लावला होता. (अर्थात त्यात विद्यार्थ्यांची चुकीची भाषा,वागणे विद्यार्थ्यांना नडले) आणि हे सर्व बदल पचवत असताना मात्र आयोगाने पुन्हा तिसरा झटका देऊन ग्रामीण भागातील या ध्येयवेढ्या भावी फौजदारांना अंधारात ढकलले.
आयोगाने COMBINE EXAM GROUP B व C एकत्र केल्या आणि ग्रामीण भागातील या तरुणांच्या उरलेल्या अपेक्षांवर पाणी फिरले. त्यांचे फौजदार होण्याचे स्वप्नभंग झाल्याच्या भावना मनामध्ये येऊ लागल्या. परीक्षा तर एकत्र केल्या मात्र चार-पाच वर्षापासून पीएसआय ची तयारी करताना परीक्षेसाठी व भविष्यात पोलीस खात्यात काम करत असताना अडचणी येऊ नयेत म्हणून केलेला कायदा देखील आयोगाने रद्द केला. पूर्वी आयोगाला किंवा पोलीस खात्याला पोलीस हा कायद्याची जाण असणारा व शारीरिक दृष्ट्या फिट हवा होता. मग असा काय बदल झाला की आता कायदा ही नको व शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त उमेदवारही नको. पोलीस खाते बदलते की आयोग आपल्या कामाचा तान कमी करते? डीवायएसपी व पीएसआय यामध्ये काम करताना काही बदल आहे की नाही? ट्रेनिंग मध्ये 11 महिन्यात काय काय करणार? शारीरिक दृष्ट्या मजबूत करणार, कायदे शिकविणार की बाकी ट्रेनिंग देणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस खात्यात गेल्यावर खरंच त्या उमेदवारांना काम करण्याची आवड राहणार की पुन्हा पुढील परीक्षेची तयारी करून दुसरी पोस्ट साठी प्रयत्न करणार?.
पीएसआय हे पद व उमेदवार फक्त नोकरी करण्यासाठी नसावे तर त्याला वर्दीची व त्यासाठी पोलीस खात्यात काम करण्याची आवड असावी तरच तो त्या खात्यात आवडीने काम करेल हे हे वास्तव आहे.
यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा कमी जास्त लेखण्याचा मुळीच उद्देश नाही. मात्र जे वास्तव आहे ते मांडत आहोत.
त्यामुळे MPSC ने पुन्हा एकदा विचार करून PSI साठी घेतली जाणारी परीक्षा ही स्वतंत्र घेण्यात यावी असा सूर स्पर्धा परीक्षा विश्वातून येत आहे….
One Comment