वास्तवMPSC

पदभरती मधील निर्बंध शिथील की विद्यार्थ्यांची दिशाभूल …

पदभरती मधील निर्बंध शिथील की विद्यार्थ्यांची दिशाभूल …

31 ऑक्टोबर 2022 रोजीचा शासन निर्णय, टायटल होते “पद भरती मधील निर्बंध शिथील करणे बाबत…”
विद्यार्थी सुखावले, मलाही आनंद झाला, सत्ताधाऱ्यांनी शासनाचा उदो उदो करायला सुरुवात केली.
मात्र हा शासन निर्णय का काढला? यामागील कारण काय? त्यासाठी दिलेली मुदत याचा कोणी विचार केला का?

खरंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळ सेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. असे या शासन निर्णयांमध्ये नमूद केले खरं पण त्यासाठी फक्त मानस असून उपयोग नाही. त्यासाठी हवी इच्छाशक्ती, पारदर्शकता, वेळेचे बंधन आणि योग्य उमेदवार निवडण्यासाठी लागणारी यंत्रणा.

हा शासन निर्णय काढला त्याला कारण आहे 30 सप्टेंबर 2022 चा शासन निर्णय.
30 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम निश्चित झालेल्या विभागांना MPSC च्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरण्याचा,
व अन्य संवर्गातील 50 टक्के पदे सरळसेवेने भरण्यास मुभा देण्यात आली होती.

31 ऑक्टोबर च्या शासन निर्णयातील शिथीलता आपण पाहू..
30 सप्टेंबर च्या GR मध्ये MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 100% रिक्त पदे भरली जाणार होती ती 31 ऑक्टोबरच्या GR मध्ये देखील भरले जाणार. मात्र सरळ सेवेमार्फत 30 सप्टेंबरच्या GR मध्ये 50% पदे भरले जाणार होती ती शिथिल करून 31 ऑक्टोबर च्या जीआर मध्ये ज्या विभागांचा आकृतीबंध निश्चित झाला अशा विभागांच्या 100% पदे भरण्यास उभा देण्यात आली.
व ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध निश्चित झाला नाही अशा विभागांना गट अ, ब व क (वाहनचालक व गट ड मधील पदे वगळता) आता सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास परवानगी दिली गेली आहे. जी की 30 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णय अनुसार 80 टक्के ऐवजी एकही पद भरले जाणार नव्हते.

त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच संवर्ग सोडता इतर 18 संवर्गातील पदे भरले जाणार नव्हते ते यामध्ये समाविष्ट होऊ शकतात परंतु तसा काही उल्लेख केलेला नाही.

शिथिलता दिली मात्र ती फक्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील भरतीसाठीच म्हणजेच दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील. आणि त्या पुढील भरतीसाठी मात्र 30 सप्टेंबर 2022 च्या जीआर नुसार असेल.
म्हणजे हे असं झालं दिवाळी ऑफर किंवा स्वातंत्र महोत्सवी ऑफर महोत्सव संपला ऑफर संपली. पुन्हा मूळ किमतीला वस्तू खरेदी करा त्याच पद्धतीने 30 सप्टेंबर 2022 च्या जीआर नुसार उर्वरित भरती केली जाईल.

31 ऑक्टोबर 2022 चा जीआर आला खरा, पद भरतीसाठी स्थिरता आली खरी , मात्र 75 हजार पद भरती सरकार करणार का? करणार तर ती कशी राबवणार? त्यासाठी कालावधी दिलाय का? 20 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आयबीपीएस IBPS, व टीसीएस TCS या कंपन्यांमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.
मात्र दुसऱ्या दिवशी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आला, त्यामध्ये परीक्षा घेण्याची जबाबदारी जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेकडे देण्यात आली.
मग या परीक्षा नक्की घेणार कोण? परीक्षा घेणार कोण या वादात 15 ऑगस्ट 2023 येऊ नये हीच अपेक्षा.

31 ऑक्टोबर च्या GR नुसार ग्रामविकास विभागातील सर्व संवर्गातील पदभरती करणार का?
पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलली ती लवकर घेणार का?.
15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75000 पैकी किती पदे भरणार? परीक्षा कोण घेणार? त्या पारदर्शक कशा होणार? आणि जर 75 हजार पदे 15 ऑगस्टपर्यंत भरणार असाल तर योग्य उमेदवार घाईघाईत मिळणार का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत.
मात्र आम्ही 75000 चा आकडा पाहूनच खुश.
मागील निवडणुकीपूर्वी दिलेले 72000 पदांचे गाजर आणि आजचे 75000 चे गाजर एकाच शेतातील नसावेत…
या 75000 पदांसाठी पुन्हा नवे महापरिक्षा पोर्टल उभे राहून संबंधितांनी 75 हजारांचे हे गाजराचे बी आता पेरले पण ते उगवून मोठे होऊन त्याचा 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना गाजराचा हलवा खायला मिळणार कि गाजर बाजारात विक्रीसाठी मांडले जाणार हे येणारा काळच ठरवेल…

किरण वसंतराव निंभोरे

संपादक

वास्तव कट्टा

Vastavkatta@gmail.com

8484086061

13 Comments

  1. I have read some good stuff here. Definitely price bookmarking for revisiting. I surprise how so much effort you set to create this type of excellent informative web site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button