
रशिया युक्रेन बाबत एवढं आक्रमक का झालंय?? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
मात्र या प्रश्नाचं एकच निश्चित असं उत्तर कोणाला माहीत नाही.
कोण म्हणतंय की यामागचं कारण या दोन देशांच्या अकराशे वर्षापूर्वीच्या इतिहासात दडलंय.
जेव्हा पूर्व यूरोपात नवव्या शतकात स्लाव्हिक वंशाच्या टोळ्यांचा देश ‘किवान रुस’ अस्तित्वात आला.
आणि and यानंतर प्रादेशिक सत्ता उदयास आल्या. त्यामुळे युक्रेन रशिया पासून वेगळा झाला.
मात्र सतराव्या शतकात युक्रेन पुन्हा रशियाशी जोडला गेला.
१९३२-३३ ला युक्रेनमध्ये (UKRAINE) पडलेल्या दुष्काळाला सोवियत युनियनला जबाबदार धरत १९९१ ला युक्रेन सोवियत युनियन मधून बाहेर पडला.
यानंतर सोवियत युनियन संपुष्टात आलं आणि यूक्रेन देखील गमावला याची एक सल कुठेतरी व्लादिमिर पुतीन यांच्या मनात आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या या संघर्षात वारंवार एक नाव समोर येतंय ते म्हणजे ‘नाटो.’
मग ही नाटो संघटना काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया या लेखातून.
‘नाटो’ म्हणजे काय? (WHAT IS NATO)
नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION) उत्तर अटलांटिक करार संघटनेचं संक्षिप्त रूप म्हणजेच नाटो. नाटोच दुसर नाव अटलांटिक अलायन्स आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि तेव्हाच सोव्हिएट रशिया अशा दोन महासत्तांमध्ये जगाची विभागणी झाली आणि शीतयुद्धाला सुरुवात झाली.
युरोपमध्ये रशियाच्या वाढत्या विस्ताराला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेत ४ एप्रिल १९४९ रोजी १२ देशांच्या मदतीने ‘नाटो’ या लष्करी संघटनेची स्थापना केली.
नाटोचे मुख्यालय बेलजीयमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.
२०१७ पर्यंत नाटोची सदस्यसंख्या २९ होती.
२७ मार्च २०२० ला उत्तर ‘मॅसेडोनिया’ हे नाटोचे सदस्य राष्ट्र बनले आणि आत्ताच्या घडीला नाटोत ३0 सदस्य देश आहेत.
नॉर्वेचे माजी पंतप्रधान ‘जेन्स स्टोटेनबर्ग’ (JENS STOLTENBERG) हे नाटोचे सध्याचे सरचिटणीस आहेत.
राजकीय आणि लष्करी माध्यमाद्वारे त्याच्या सदस्यांच्या स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची हमी देत त्यांच संरक्षण करण्याचा उद्देश समोर ठेवत नाटो स्थापन करण्यात आली.
१९४९ मध्ये अमेरिका, इटली, फ्रान्स यांसारख्या देशांनी मिळून ही संघटना स्थापन केली.
१९५५ मध्ये नाटोच्या स्थापनेला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने रशियाने देखील ‘वाॅर्सा पॅक्ट’ म्हणून ओळखली जाणारी युरोपातील साम्यवादी देशांची लष्करी संघटना स्थापन केली.
मात्र १९९१ मध्ये सोवियत युनियनचं विघटन झालं आणि सोवियत युनियन (SOVIET UNION) मधले अनेक देश नाटो चे सदस्य बनले.
नाटो ही तीस सार्वभौम राष्ट्रांची युती आहे. नाटोकडे संसद नाही, कायदे नाहीत आणि वैयक्तिक नागरिकांना शिक्षा करण्याचा अधिकार देखील नाटोकडे नाही.
सार्वभौमत्वाच्या या अभावाचा परिणाम म्हणून की काय नाटो कमांडरची शक्ती आणि अधिकार मर्यादित आहेत.
कर्तव्यात दुर्लक्ष, वरिष्ठ अधिकार्यांचा अनादर, कायदेशीर आदेशाचे पालन करण्यात अयशस्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना शिक्षा करण्याचा अधिकार नाटोकडे नाही.
रशिया ला भीती वाटते की युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाश्चात्य देश रशियाचा भूभाग बळकावतील.
तर पाश्चिमात्य देशांना वाटतय जर रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं. तर पुढे लॅटविया आणि लिथूऍनिया या दोन देशांवर देखील आक्रमण होईल.
आणि जर असं झालं तर, नाटो मधील सर्व देश रशियावर आक्रमण करतील.
कारण लॅटविया आणि लिथुऍनिया हे नाटो चे सदस्य देश आहेत.