१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणूनच का साजरा करतात?

१४ फेब्रुवारी म्हटलं की सगळ्या तरुण पिढीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. एखाद्या व्यक्तीला मनातील भावना सांगणं, जोडीदारासोबत वेळ घालवण, प्रेम व्यक्त करणं अशा एक ना अनेक प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. पण या व्हॅलेंटाईन डे(valentines day)ची सुरुवात कशी झाली? कोणी केली? आणि हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणूनच का साजरा करतात याचं कारण कोणाला फारसं माहीत नाही.
याचं नेमकं कारण माहीत नसलं तरी हा दिवस साजरा करण्यामागे अनेक दंतकथा आहेत. एक कथा अशी आहे की, इसवी सन २७० मध्ये रोमन साम्राज्याचा ‘क्लाऊडियस गोथिकस द्वितीय’ नावाचा राजा होता.या राजाला प्रेम, विवाह या गोष्टींचा फार तिरस्कार होता. यामुळे सैनिक लक्ष्य विसरतात अशी त्या राजाची समजूत होती. त्यासाठी त्याने सैनिकांना प्रेमात न पडण्याची आणि विवाह न करण्याची सक्त ताकीद दिली होती.
अविवाहित राहिल्याने सैनिकांचे मनोबल आणि ताकत वाढते असं त्या राजाला वाटायचं. सैनिकांना राजाचा आदेश अजिबात पटला नाही. संत व्हॅलेंटाईन यांनी राजाच्या या आदेशाचा विरोध दर्शवत रोमन साम्राज्याला प्रेमाचा संदेश दिला. राजाच्या विरोधात जाऊन प्रेम करण्याची सैनिकांना प्रेरणा दिली. संत व्हॅलेंटाइन यांनी अनेक सैनिकांचे लग्न लावून दिले. हा प्रकार समजल्यावर राजाने त्यांना मारण्याचे आदेश दिले. मरण्याच्या आधी त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. ज्या दिवशी त्यांना मारण्यात आले तो दिवस होता १४ फेब्रुवारी चा.
संत व्हॅलेंटाइन यांनी मृत्यूपूर्वी एका जेलरच्या आंधळ्या मुलीला बरं केलं असल्याची दंतकथा देखील सांगितली जाते. फाशी जाण्याआधी व्हॅलेंटाईन यांनी त्या मुलीला एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात ” देवावर विश्वास ठेव” आणि पत्राच्या शेवटी “फ्रॉम युवर व्हेलेंटाईन” असं लिहिलं होतं. त्यानंतर १४ फेब्रुवारी सण २६९ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. आणि म्हणून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. सुरूवातीला व्हॅलेंटाईन डे ला ग्रीटिंग कार्ड भेट दिले जायचे. इंग्लंडमध्ये फुल आणि मिठाई देण्याची सुरुवात झाली. पुढे इंग्रजी भाषेत जगभर पसरले, त्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या प्रथा इतर देशांमध्ये पसरल्या आणि हा दिवस साजरा करण्याच स्वरूप बदलत गेलं.