संयुक्त पूर्व परीक्षा गट -ब या परीक्षेची तारीख घोषित करण्यासाठी MPSC STUDENTS RIGHTS संघटनेचा पत्रव्यवहार सुरू

विध्यार्थी आक्रमक पवित्र्यात..
सततची पुढे ढकलणारी संयुक्त पूर्व परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून आणि कोरोनाची ओसरती लाट पाहून MPSC STUDENTS RIGHTS या संघटनेने आता मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव व इतर मंत्री महोदयांकडे परीक्षेची तारीख जाहीर करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
राज्यसरकार आणि MPSC लवकरात लवकर जर परीक्षांच्या तारखा घोषित केल्या नाहीत तर विध्यार्थी आक्रमक होऊन रस्त्यावर देखील येतील असे कित्येक विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केली आहेत. विद्यार्थ्यांची सविस्तर मागणी खालीलप्रमाणे…
प्रति,
मा.श्री. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
विषय-: संयुक्त पूर्व परीक्षा गट -ब या परीक्षेची तारीख घोषित करणेबाबत.
मा. महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की, संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब ही परीक्षा मागील वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली. राज्य शासनाने या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला होता. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच विविध जिल्हे देखील अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने केलेल्या योग्य उपाययोजनांमुळे ही संख्या आटोक्यात आणण्यात राज्य शासनाला यश आलेले आहे.
त्यामुळे आता राज्य शासनाने एमपीएससी परीक्षांबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व तयारी केली असल्याचे समजत आहे. यामुळे आता ही परीक्षा लवकर घेणे अपेक्षित आहे. कारण परीक्षा वारंवार पुढे गेल्यामुळे उमेदवारांचे वय वाढत आहे तसेच त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मानसिक ताण, कौटुंबिक त्रास, सामाजिक दबाव अशा विविध कारणांना या उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे राज्य शासनाने या परीक्षांची तारीख लवकरच घोषित करणे आवश्यक आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
कळावे,